मँचेस्टर कसोटी सामना रिशेड्युल करण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया
मँचेस्टर,
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर खेळवण्यात येणारा पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला. बीसीसीआयने याची घोषणा केली. यानंतर त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आम्ही कोणताही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितलं. बोर्ड आता पुन्हा मँचेस्टर कसोटीचे आयोजन करू इच्छित आहे. बोर्डाच्या या निर्णयाचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी स्वागत केले आहे.
बीसीसीआय ओल्ड ट्रॅफोर्ड कसोटी सामना पुन्हा आयोजित करू इच्छित आहे. यावर सुनील गावसकर म्हणाले की, आपण भारतीयांनी विसरले नाही पाहिजे की, इंग्लंड संघाने 2008 मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारताचा दौरा केला होता. ते त्यावेळी म्हणू शकले असते आम्ही येऊ शकत नाही म्हणून. पण त्यांनी असं केलं नाही. यामुळे आपण विसरले नाही पाहिजे की, केविन पीटरसन याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने भारताचा दौरा केला. जर केविन पीटरसन याने नकार दिला असता तर तो दौरा संपलाच असता. पण पीटरसन याने सगळ्यांची मनधारणी करत तो सगळ्यांना घेऊन भारताला आला.
इंग्लंडचा संघ 2008 मध्ये भारतीय दौर्यावर आला होता. त्यावेळी मुंबईमध्ये आतंकवादी हल्ला झाला. तेव्हा इंग्लंडचा संघ उभय संघातील दौरा मध्यातून सोडून परत मायदेशी परतला होता. पुढील महिन्यात ते पुन्हा राहिलेले दोन सामने खेळण्यासाठी भारताला आले होते.
शुक्रवार (10 सप्टेंबर) पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार होती. परंतु सामन्याच्या एक दिवस आधी गुरूवारी भारतीय संघाचे ज्यूनियर फिजीओ योगेश परमार कोरोना बाधीत आढळले. त्यामुळे संघातील इतर खेळाडू घाबरले. तेव्हा सामना रद्द करण्यात आला. आता बीसीसीआयने हा सामना पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.