क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रीय ज्युडो खेळाडूला मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे प्रतिनिधी
5 ऑगस्ट
पुण्याच्या हडपसर भागात एका राष्ट्रीय ज्युडो खेळाडूला क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याता आल्याचा प्रकार घडला आहे. फातिमानगर चौकात सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरून सुमित टिळेकर या बांधकाम व्यावसायिकानं वैष्णवी ठुबे या राष्ट्रीय ज्युडो खेळाडूला लाकडी दंडुक्यानं मारहाण केली.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी कार चालकावर आणि कारमधील एका महिलेवर गुन्हा दाखल केला असला तरी केवळ किरकोळ मारहाणीची कलमं लावल्याचा आरोप वैष्णवीनं केलाय. टिळेकरनं मारहाण करताना जिवे मारण्याची धमकी दिली असून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तिनं केलीये. या मारहाणीत वैष्णवीचा हात फ्रॅक्चर झाला असून अंगावर जखमाही झाल्या आहेत.
नेमकी घटना काय?
हडपसर भागात वैष्णवी ठुबे दुचाकीवरुन जात असताना सुमित टिळेकर आपली बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने पुढे आला. यावेळी सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या क्षुल्लक कारणावरुन सुमित टिळेकरने वैष्णवीला शिवीगाळ केली. पण इतक्यावरच न थांबता त्याने लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप वैष्णवीने केला आहे. या मारहाणीत वैष्णवीच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे.
लाकडी दांडक्याचा फटका माझ्या डोक्यावर बसला असता, पण मी माझा बचाव करुन घेतला. हात मध्ये घातल्याने हाताला दुखापत झाली आहे. घटनेमुळे माझ्या कारकिर्दीला ब-ेक लागला आहे, असं वैष्णवी ठुबेने म्हटलं आहे.