वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे – पालकमंत्री
‘एक पद एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ
सोलापूर, दि. 25 पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड जेवढी महत्त्वाची तेवढेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ‘एक पद एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ श्री. भरणे यांच्या हस्ते शासकीय पोल्ट्री फार्म, नेहरूनगर सोलापूर येथे करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जावेद शेख, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके, कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.भरणे म्हणाले, ‘वृक्ष लागवड उपक्रमाची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करावेत. पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपलब्ध मोकळ्या जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमीन, नदी, नाले यांच्या काठावर किमान एक झाड लावावे, जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेबरोबरच विविध उपक्रम यशस्वी केले. आता एक पद एक वृक्ष हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
वृक्ष लावणारा करणार संगोपन-स्वामी
‘एक पद एक वृक्ष’ ही मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असून यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी कर्मचारी व मानधनावरील कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या संबंधित सहकारी संस्था यांच्याकडून एकूण 20 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय जागा, इमारत परिसर, बँका, रुग्णालय आदी ठिकाणी लावण्यात येणार आहेत. लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपनही संबंधितांनीच करावयाचे असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले.