उसाच्या थकीत बिलासाठी शेतकर्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ’अर्धनग्न मोर्चा’
सांगली
भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्या कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये शेतकर्यांनी थेट अर्धनग्न मोर्चा काढत निषेध आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
तासगाव आणि नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकर्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत आहेत. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मालकीचे हे दोन्ही कारखाने आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ही थकीत बाकी देण्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र, संजयकाका पाटील यांच्याकडून केवळ आश्वासने देण्यात असून त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. हा मोर्च्यात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून शेतकर्यांची थकीत देणी गेल्या आठ महिन्यांपासून देण्यात आलेली नाहीत. याबाबत वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, फक्त आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आमच्यासमोर उघडे झाल्याशिवाय पर्याय नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चड्डी आणि बनियनवर हा मोर्चा काढला. जर तातडीने ही बिले दिली नाहीत. तर पुढील काळात आम्हाला नग्न होऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.