सिद्धीविनायकाला म्हणालो.. बाप्पा लक्ष ठेव, माझ्यावर नाही तर लोकांवर; अजित पवारांची मिश्किल कोटी
पुणे,
घटनस्थापनच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे भक्तांना दर्शनासाठी खुली झाली. त्यावेळी पहाटेच जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यावेळी सिद्धीविनायकाला काय साकडे घातले हे सांगत असताना अजित पवार यांनी मिश्किल टिपन्नी केली आहे. ’आता मंदिरे उघडली आहेत. मी सुद्धा सिद्धीविनायकाचे पहाटे दर्शन घेतले. बाप्पा लक्ष ठेव. मात्र लक्ष माझ्यावर नाही तर लोकांच्यावर ठेव, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको’, असे साकडे घातले असल्याचे पावर म्हणाले आणि या त्यांच्या मिश्किल कोटीवर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
मागील चार दिवसांपासून उपमुख्यमंत्री पवार यांच्या निकटवर्तीयांशी सबंधीत कंपन्यावर बारामती, दौंड, काटेवाडी आदी ठिकाणी आयकर विभागाचे छापे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तर पवार यांनी हे वत्कव्य केले नसेल ना अशी चर्चा कार्यक्रम झाल्यानंतर रंगली होती. बारामती येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन रविवारी (दि. 10) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, मास्क वापरालाच पाहिजे. मी फक्त पाणी पिताना, जेवन करतानाच मास्क काढतो. माझं अनुकरण तुम्ही करावे यासाठी मी मास्क सातत्याने वापरत आहे. तिसरी लाट आली की आम्हाला नकोनको होते. मी हे पोटतिडकीने ऐवढ्यासाठी सांगत आहे की, कोरोना वाढला की आम्हाला विकास कामांचा सगळा निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागतो. शेवटी माणसाचा जीव वाचवणे हे प्रथम कर्त्यव्य आहे. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलग 75 तास लसीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आला. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. शनिवारी पुणे येथील कोरोना आढावा बैठकीमध्ये देखील ‘हाऊस टू हाऊस’ लसीकरणाचा सर्व्हे तसेच लसीकरण करण्याच्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठांना विश्वासात घेऊन काही सुधारणा करा. मी पहाणी करताना काही बारिक-सारिक चुका राहिलेल्या दिसून आल्या आहेत, त्या सुधारा. मला काय मी रात्री-अपरात्री किंवा पहाटे पाच वाजताच येऊन पाहत बसेल, मला सवय आहे. त्यावेळी रात्रीचे डॉक्टर जागे असले पाहिजेत, नर्सेस जाग्या असल्या पाहिजेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाची व डॉक्टरांची फिरकी घेतली.