बहादरपूर येथे आज श्री बद्रीनारायणांचा रथोत्सव..
पारोळा प्रतिनिधी –
बहादरपूर (ता.पारोळा) येथे १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान भगवान श्री बद्रीनारायणांचा यात्रोत्सव सोहळा आहे.ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बहादरपूरची यात्रा ओळखली जाते.काल बुधवारी सायंकाळी ७ वाजता ‘श्रीं’ च्या वहनांची मिरवणूक काढण्यात आली.आज १४ रोजी रथोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
१९२४ पासून रथाची व यात्रेची परंपरा आजतागायत सुरू आहे. ३५ फूट भव्य उंच हा रथ कै. रामलाल मिश्रा यांनी सागवान लाकडापासून तयार केलेला आहे.हा रथ अखंड असून सर्वात अधिक कोरीव काम रथावर केले आहे.एवढा भव्य दिव्य रथ हा गल्ली बोळातून चिंचेच्या लाकडापासून बनवलेल्या
मोगरीवर फिरवण्यात येतो. बद्रीनाथांच्या जयघोषात संपूर्ण बहादरपूर,शिरसोदे नगरी दुमदुमून जाते.दुपारी १२ वाजता श्री बद्रीनारायणाची मूर्तीस आरती करून रथावर विराजमान करून ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल.दरम्यान या सोहळ्यानिमित्त या पाच दिवसांत भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजीत केला आहे.