लाच भोवली – ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवक जाळ्यात..
पारोळा प्रतिनिधी –
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाकडून मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामांची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच स्वीकारताना ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला जळगांव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील रहिवासी असुन ग्रामपंचायत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेव्हर ब्लॉक करण्याचे १५ लाखाचे प्रत्येकी ४ कामे अशी ६० लाखांचे कामे शासनाकडून मंजूर होऊन आले होते.या कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (२८) याने ग्रामविस्तार अधिकारी सुनिल अमृत पाटील (५८) यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली.दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता सापळा रचून कंत्राटी सहाय्यकामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदर कारवाई जळगाव लाप्रवि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, स्मिता नवघरे,कॉन्स्टेबल सुनिल वानखेडे,किशोर महाजन,बाळू मराठे,सुरेश पाटील,रवींद्र घुगे, प्रदीप पोळ,सचिन चाटे आदींचा पथकाने केली.