जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा !: नाना पटोले
पालघर,
काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचार सभेत पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला, त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजपा सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती मविआ सरकारने पुन्हा सुरु केली. भाजपाने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस 900 रुपये झाला, एवढा महाग गॅस गरिबांना परवत नाही त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तु बनून राहिली आहे. यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपाचा डाव आहे. सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहिल.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होत.
दलित पँथरचा काँग्रेसला पाठिंबा…
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या पोटनिवडणुकीसाठी दलित पँथरने काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याने पाठिंबा देत असल्याचे दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.