श्रमिकबलाच्या सहभागातील स्त्री-पुरुष भेद कमी करण्यासाठी भारतात एकत्रित प्रयत्न सुरु- श्रम मंत्री.जी-20 देशांच्या श्रम आणि रोजगारमंत्र्यांच्या बैठकीत ‘घोषणापत्र आणि इडब्ल्यूजी प्राधान्यक्रम’ या विषयावर संतोष गंगवार यांचे व्याख्यान

नवी दिल्ली 23 JUN 2021

श्रमिकबलाच्या सहभागातील स्त्री-पुरुष भेद कमी करण्यासाठी भारतात एकत्रित प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी केले. ‘शिक्षण’, ‘प्रशिक्षण’, ‘कौशल्य-प्रशिक्षण’, ‘उद्योजकता विकास’ आणि ‘समान कामासाठी समान वेतन’ या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारतात प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणले. ते आज जी-20 देशांच्या श्रम आणि रोजगारमंत्र्यांच्या बैठकीत ‘घोषणापत्र आणि इडब्ल्यूजी (रोजगार कार्यगट) प्राधान्यक्रम’ या विषयावर व्याख्यान देत होते. वेतन, भर्ती आणि रोजगारविषयक अटी या बाबतींतील स्त्री-पुरुष विषमता कमी करण्यासाठी नवीन ‘वेतन संहिता,2019’ उपयुक्त ठरेल असा विश्वास गंगवार यांनी व्यक्त केला. सर्व आस्थापनांमधील सर्व प्रकारची कामे स्त्रियांना मिळाली पाहिजेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी नियोक्त्यांनी घेतलीच पाहिजे, तसेच कामाच्या तासांबद्दलच्या तरतुदीकडेही त्यांनी लक्ष दिले पाहिजे. स्त्रिया आता रात्रपाळीतही काम करू शकतात.

प्रसूतीसाठीच्या पगारी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून वाढवून 26 आठवडे करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे छोटे उद्योग सुरु करण्यासाठी उद्योजिकांना पाठबळ दिले जात आहे. या योजनेंतर्गत 9 हजार अब्ज रुपयांची तारणमुक्त कर्जे वितरित करण्यात आली आहेत. या योजनेत सुमारे 70% खाती स्त्रियांची आहेत.

नवीन सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये आता, स्वयं-रोजगार असणाऱ्यांचा तसेच श्रमिकबलाच्या अन्य सर्व वर्गांचाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत समावेश होण्याची शक्यता आहे, असेही गंगवार यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रातीळ कामगारांसाठी 2019 मध्ये सुरु केलेल्या ऐच्छिक आणि योगदानात्मक निवृत्तिवेतन योजनेद्वारे वयाच्या 60 वर्षांनंतर किमान निवृत्तिवेतनाची हमी मिळते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!