आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 साजरा करण्यासाठी एनटीपीसी सज्ज
नवी दिल्ली, 18 जून 2021
ऊर्जा मंत्रालयाच्या अख्त्यारीत्तील भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी, येत्या 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या योगदिनाच्या कार्यक्रमांसाठी सर्व उर्जा केंद्रांवर जय्यत तयारी सुरु आहे.
यानिमित्त एनटीपीसीच्या विविध कार्यालयांमध्ये वेबिनार्स, विविध स्पर्धा, व्याख्याने, परिषदा, थेट योगाभ्यास सत्रे, तसेच सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी योगाभ्यास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड नियमांचे पालन करुन हा कार्यशाळा होणार आहेत.
‘योग’ हा शब्द संस्कृतमधील मूळ युज धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जोडणे’ किंवा ‘एकत्रित येणे’असा आहे. योगशास्त्रानुसार, योगाभ्यासामुळे तन आणि मनाचा सहजसुंदर संयोग घडून येतो.
गेल्या अनेक वर्षांपासून योगाभ्यास केला जात असून माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाभ्यासाचा उपयोग होत आहे. प्रत्येक योगासन आणि प्राणायाम शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी, ताकद, समतोल आणि मन शांतचित्त, स्थिर करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
कोविड-19 मुळे लोकांमधील ताणतणाव आणि चिंता, अस्वस्थता वाढली आहे. अशावेळी, योगाभ्यासामुळे त्यां ना आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य जपण्यास मदत होऊ शकते.