टोमण्यांना वैतागून उचलले टोकाचे पाऊल; घरजावयाने केली सासू, पत्नीची गोळी झाडून हत्या

नवी दिल्ली,

राजधानीत एका व्यक्तीने पत्नी आणि सासूची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा केल्यानंतर त्याने पोलिसांना बोलावून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश हा पत्नीसह सासूच्या घरी बाबा हरिदास नगरमध्ये राहायचा, त्यामुळे ते त्याला टोमणे मारायचे.. यातून झालेल्या वादात त्याने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची कबूली दिली आहे.

बाबा हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासर्‍यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या व्यक्तीस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. आरोपीने गोळी झाडल्यामुळे दोन्ही महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नी निधी आणि सासू वीरो असे हत्या केलेल्या महिलेची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अटक केली आहे. तसेच, पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!