काल दिवसभरात देशात 18 हजार 795 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 179 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरताना दिसत आहे. काल दिवसभरात देशात 18 हजार 795 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 179 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल देशात नोंद झालेली रुग्णसंख्या ही मागील साडेसहा महिन्यांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. काल दिवसभरात देशात 26 हजार 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच काल देशात पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाच्या लसीचे एक कोटी डोस देण्यात आले असून आतापर्यंत 87 कोटी डोस पूर्ण झाले आहेत. तर काल केरळमध्ये 11 हजार 699 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 58 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या केरळमध्ये एक लाख 57 हजार 158 सक्रिय रुग्ण संख्या आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख खाली येत असल्याचे पहायला मिळत असून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात 2895 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल राज्यात 2 हजार 432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 62 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.26 टक्के आहे.