लातुरातील गुटखा किंगला हादरा; 2 दिवसांच्या छापेमारीत तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त
लातूर,
लातूरमधील गंजगोलाई परिसरातील एका दुकानातून तब्बल सव्वा कोटींचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. लातूर पोलिसांच्या छापेमारीदरम्यान हा प्रकार उघड झाला. गेल्या अनेक दिवसांपासून लातुरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीरपणे गुटखा आणि तंबाखू विक्री सुरू होती. अखेर छापेमारीत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाकडून लातूर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गंजगोलाईतील एका दुकानात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची टीप त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापेमारी केली. गंजगोलाईतील प्रेम एजन्सीच्या नावे असलेल्या एका दुकानावर आणि त्याने भाडे तत्त्वावर घेतलेल्या विविध गोदामांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. दोन दिवस हे धाडसत्र सुरू होतं. सर्व गुटख्याची पाहणी केली तर हा आकडा 1 कोटी 25 लाख रुपयांचा असल्याचं समोर आलं आहे.
प्रेम एजन्सीचा मालक प्रेमनाथ तुकाराम मोरे व त्याचा सहकारी शिवाजी मोहिते सावकार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या प्रकरणात आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे लातुरातील गुटखा किंगला चांगलाच धक्का बसला आहे. हा येथील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.
लातूरमध्ये आलेला गुटखा हा कर्नाटकातून आल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकातकून अवैध गुटख्याची विक्री सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकातून आणलेला हा गुटखा थेट दुकानदारांना वितरीत केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.