आमदार रोहित पवार उभारत असलेला स्वराज ध्वज विठ्ठलाच्या दारी, कार्यकर्त्यांच्या गर्दीत कोरोना नियमांचे तीनतेरा

पंढरपूर,

राष्ट्रवादी काँग-ेसचे जामखेडचे आमदार रोहित पवार उभा करत असलेल्या स्वराज ध्वजाचे आज पंढरपूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी तुफानी गर्दी केल्याने कोरोना नियमाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसत होते. अजूनही कोरोनाचे संकट पंढरपूर परिसरात सुरु असून तिसर्‍या लाटेचा धोका असताना गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत असताना आज स्वराज ध्वजाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफानी गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले.

हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई झालेल्या खर्डा या गावी हा तरुणाईला प्रेरणा देणारा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज दसर्‍यादिवशी फडकावला जाणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या ध्वज स्तंभाचे वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. सध्या अयोध्या मथुरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 12 हजार किलोमीटरचा प्रवास करत 96 शक्तीपीठांमध्ये पूजन करून हा ध्वज विठुरायाच्या दारात आला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान आज दुपारी हा ध्वज येताच कार्यकर्त्यांनी याच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला हा ध्वज संत नामदेव मंदिर येथे नेऊन नंतर तो विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे पूजनाला आणण्यात आला. येथे मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी स्वराज ध्वजाचे पूजन केले. यानंतर आता हा ध्वज सिद्धटेक येथे जाणार असून 15 ऑॅक्टोबर म्हणजे दसर्‍याच्या दिवशी जामखेड तालुक्यातील खर्डा या गावी या समतेचा आणि एकटेच संदेश देणार्‍या ध्वजाचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!