डोंबिवली सामूहिक अत्याचारप्रकरणी अटक आरोपींमुळे ’लॉकअप रुम फुल्ल’

ठाणे,

डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यत या गुन्ह्यातील 33 आरोपींना अटक केली आहे. आता एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना अटक झाल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे  लॉकअप रूम फुल्ल झाले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला व पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र अशी लॉकअप रूम असते. तसेच दररोज घडणार्‍या गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार तपासासाठी सुरुवातीच्या काळात याच लॉकअप रूममध्ये ठेवले जाते. साधारणपणे 15 ते 20 आरोपींना पुरेसे होईल अशी लॉकअप रूम असते. मानपाडा पोलीस ठाण्यात 4 लॉकअप रूम आहेत. त्यामध्ये प्रत्येक रूममध्ये 6 ते 7 आरोपींची व्यवस्था होत आहे. मात्र सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात एकूण अटक आरोपींची संख्या 33 वर पोहचली असून त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 33 आरोपी मानपाडा पोलीस ठाण्याच्या लॉकअप रूममध्ये असल्याने लॉकअप रूम फुल्ल झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सर्व आरोपी एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याने त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दररोज घडणार्‍या इतर गुन्ह्यातील आरोपींना आता इतर पोलीस ठाण्यात ठेवण्याची वेळ पोलीस ठाण्यावर आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष महिला तपास पोलीस अधिकारी म्हणून ठाण्याच्या सहायक आयुक्त सोनाली ढोले यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे केवळ फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या गुन्ह्याच्या तपासापासून दूरच ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पीडितेची प्रकृती ठीक असल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील आणखी काही आरोपी अजूनही फरार असल्याने तिच्या कुटुंबीयांना व घराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असलेले व्हिडिओ आरोपींनी डिलीट केल्याने ते व्हिडिओ परत मिळविण्यासाठी आरोपींचे मोबाइल आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!