अल्पवयीन विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चुलत सासर्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1.50लाख रूपये दंडाची शिक्षा
पोलादपूर
तालुक्यात पावसाळ्यानंतर घाटावरून मेंढरं घेऊन कोकणात येणार्या एका धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेवर तिच्याच चुलत सासर्याने तिचे अपहरण करून वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला. याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी तिच्या चुलत सासर्याला अटक केल्यानंतर माणगांव सत्र न्यायालयाने मंगळवार, दि. 21 सप्टेंबर 2021 रोजी आरोपी चुलत सासर्यावरील आरोप सिध्द झाल्याने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1.50लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोलादपूर तालुक्यातील धारवली येथील गुन्ह्याबाबत माणगाव सत्र न्यायालयाने हा अल्पवयीन विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिल्याने पोलादपूर तालुक्यातील अन्य पोक्सो गुन्ह्यांतील आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
पिडीतेच्या अपहरणानंतर दिला गुंगारा
पोलादपूर तालुक्यातील धारवली या गावामध्ये सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खेडेगांव ब-ाह्मणदरा गुळूंचे येथून धनगर कुटूंब मेंढरं घेऊन दरवर्षीप्रमाणे आले आहे. यापैकी एका अल्पवयीन विवाहितेला, तिचा चुलत सासरा याने तिला, तिचा नवरा नवनाथ याने दुसरी बायको केली असल्याची बतावणी करीत शनिवार,दि.13 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नवर्याचे ठिकाण दाखविण्याचे निमित्त करून तिला आणि तिच्या सासर्यांना स्वत:च्या लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर बसवून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत नेले. याठिकाणी तिच्या सासर्याला मोटारसायकलवरून उतरविले आणि तिच्या सासर्याला, तुम्हाला पाहताच तुमचा मुलगा नवनाथ हा गुंगारा देऊन निघून गेला तर गावणार नाही, असे सांगून मागून दुसर्या वाहनाने येण्यास सांगितले आणि पिडीतेच्या सासर्याला गुंगारा दिला.
यानंतर आरोपी देवा दगडे याने या अल्पवयीन विवाहितेला तिचा नवरा असलेले ठिकाण दाखविण्याचा बहाणा करून ऐक बये,‘तुझा नवरा झालाय दुसरीचा भरतार’अशी सातत्याने थाप मारून महाड तालुक्यातील वरंध पुणे रस्त्यावरील वरंध घाटात रस्त्यालगत राजमाता असे लिहिलेल्या टपरीमध्ये नेऊन तिला मारहाण करून तिची साडी व कपडे वर करून तिच्या तोंडावर हात दाबून बळजबरीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतरही वाघजाई मंदिराच्या पडवीमध्ये दोनवेळा जबरदस्तीने चुलत सासर्याने शरीरसंबंध ठेवले.
बनाव करून अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार
रविवार दि. 14 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सदर अल्पवयीन विवाहिता आढळून आली नसल्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याच्या हेतूने तिचे अपहरण करून बलात्कार करण्यासाठीच तिच्याच चुलत सासर्याने हा बनाव केल्याचे समजून आल्याने तिच्या नातेवाईकांनी रविवारी संध्याकाळी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये तिच्यासोबत धाव घेऊन तक्रार दाखल केली. रविवारी रात्री पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तिची वैद्यकीय तपासणी डॉ.भाग्यरेखा पाटील यांनी करून पोलादपूर पोलीसांना तसा अहवाल दिला. सदर अल्पवयीन विवाहिता पाचवी इयत्तेपर्यंत शिकलेली असून केवळ 15 वर्षे वयाची आहे. त्यामुळे या अत्याचारप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी आरोपीविरूध्द लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3(अ),4,5,(ल)(न)6 नुसार भादंवि कलम 363,366, 376, 323 प्रमाणे दखलपात्र गुन्हा र.नं. 3-2018 नुसार पिडीतेचा चुलत सासरा असलेल्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपासासाठी फिर्यादी अत्याचारित अल्पवयीन तरूणीला ताब्यात ठेऊन अधिक तपास कार्य पोलादपूर पोलीसांनी सुरू केले. यावेळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार यांनी तपास सुरू केला.
आरोपीचे धाडस आले अंगाशी
आरोपी चुलत सासर्याच्या शोधासाठी महिला पोलीस कर्मचारी खाडे यांच्यासोबतीने सदर अल्पवयीन विवाहितेला घेऊन सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार आणि अन्य पोलीस कर्मचारी पुणे जिल्ह्यातील निरा भागात गेले होते. याचवेळी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी संदीप शिरगांवकर यांना आरोपीचा भाऊ नायकू असल्याचे सांगून एक तरूण भेटायला आला. शिरगांवकर यांनी त्याची चौकशी केली आणि तो निघून गेला. मात्र, शिरगांवकर यांनी तातडीने सहायक पोलीस निरिक्षक पवार यांच्याशी संपर्क साधून या तरूणाबाबत माहिती दिली असता सदर अल्पवयीन विवाहितेने तिच्या चुलत सासर्याचेच नांव नायकू असल्याचे सांगितल्याने यावेळी सदर कागदपत्रांवरील नांव आणि फोटो असल्याचे दिसून आल्याने अत्याचारित अल्पवयीन विवाहितेला विचारले असता तिचा चुलत सासरा याला नायकू या नावानेही हाक मारतात, असे तिने सांगितल्याने पोलादपूर पोलीसांची तारांबळ उडाली. यामुळे शिरगांवकर आणि पिंगळे तसेच कर्मचार्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पोलादपूर नजिकच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या चरई येथील पुलाजवळ देवा ऊर्फ नायकू हा दिसून आला. यावेळी पोलीसांनी चरईतील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला गराडा घालून पकडून पोलीस ठाण्यामध्ये आणले आणि त्यास अटक करून झाडाझडती घेतली असता त्याने केलेला गुन्हा कबूल केला आणि फिर्यादीनेही आरोपीला ओळखले. नायकू या चुलत सासर्याला पुरंदर तालुक्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
आरोपीचे असेही कारनामे
अटकेपूर्वी आरोपी त्याचाच भाऊ नायकू असल्याची थाप मारून पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यासाठी स्वत: गेला होता. यानंतर आरोपी चुलत सासर्याने अल्पवयीन विवाहितेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची तक्रारही केली होती. याखेरिज, त्याने कोर्टाला व पोलीसांना आंधळा असल्याचे भासवून दिशाभूल केली होती. जुलै 2021 मध्ये नेहुली कोविड सेंटरमधून तो पोलीसांच्या ताब्यातून पळूनही गेला होता. अशाप्रकारे अल्पवयीन विवाहितेवरील बलात्कारप्रकरणी आरोपी असलेल्या तिच्याच चुलत सासर्याच्या कारनाम्यांचा माणगांव सत्र न्यायालयामध्ये उल्लेख झाला.
अखेर आरोपीला झाली सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार यांनी तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालय माणगांव येथे होऊन पिडीत अल्पवयीन विवाहितेची साक्ष महत्वाचा पुरावा ठरला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष पैरवी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक यु.एल.धुमास्कर, महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, हवालदार शशिकांत गोविलकर आणि पोलीस शिपाई सुनील गोळे यांनी सहकार्य केले. या खटल्यामध्ये अॅड.जितेंद्र म्हात्रे यांनी सरकारी वकील म्हणून प्रभावीपणे काम करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष व सत्र न्यायाधीश श्रीमती पी.पी.बनकर यांनी आरोपीवरील गुन्हा शाबीत झाल्याने लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5,(ल)(न)6 सह भादंवि कलम 363,366, 376, 323 प्रमाणे दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1.50 लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.