भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलिसांकडून अटक

बारामती,

बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत 2 लाख 51 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोहर भोसले यांना अटक करण्यात आली आहे. मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे. मनोहर भोसले यांना सातारा जिल्ह्यातील ?सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतलं आहे.

मनोहर मामा भोसलेंसह इतर दोघांनी फसवणूक केल्याबद्दल बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर भोसले यांच्या विरोधात शशिकांत खरात यांनी तक्रार दाखल केली होती. शशिकांत खरात हे बारामती तालुक्यातील गोजुबाबी इथले रहिवासी आहेत. शशिकांत खरात यांच्या वडिलांना थायरॉईड आणि कॅन्सर झाला होता. त्यांच्या वडिलांवर उपाय करण्यासाठी उंदरगावला शशिकांत खरात हे त्यांच्या वडिलांना घेऊन गेले. मनोहर मामा भोसले यांनी स्वत: बाळू मामांचा अवतार असल्याचा बनाव केला. खरात यांच्या वडिलांना झालेल्या कॅन्सरवर उपाय म्हणून बाभळीच्या पाला, साखर आणि भंडारा खाण्यास देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.

शशिकांत खरात यांची मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी वेळोवेळी 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार खरात यांनी बारामतीत पोलिसांना दिली. मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंद कायदा अंतर्गत यांच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर भोसले यांना उद्या बारामती कोर्टात हजर केलं जाणार आहे. मनोहर भोसेलच्या इतर साथीदारांचा शोध बारामती पोलीस घेत आहेत.

मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्यावर एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले आहे. करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा तर बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोहरमामा चर्चेत आहेत. त्यांनी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेत या आरोपांचे खंडन केले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!