संगमेश्वरमध्ये तरुणाकडून 18 गावठी बॉम्ब जप्त, आरोपीला अटक
रत्नागिरी,
संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे मराठवाडी येथील तरुणाकडून पोलिसांनी 18 गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. या प्रकरणी संबंधित तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 9 हजार रुपये किमतीचे हे 18 गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सुरेश आत्माराम किर्वे ( रा . हरपुडे मराठवाडी , वय 48 वर्षे ) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार रत्नागिरी येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष शेलार यांनी दिली आहे.
हरपुडे मराठवाडी येथील सुरेश किर्वे यांच्या घरातून दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक पथकाने तब्बल 9 हजार रुपये किमतीचे 18 गावठी बॉम्ब बुधवारी जप्त केले. स्फोटक पदार्थ, जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीर ताब्यात ठेवून मानवी व प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सुरेश किर्वे यांच्यावर बुधवारी रात्री अकरा वाजता कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात भारताचा बारी अधिनियम 1908 चे कलम पाच व भारतीय दंड विधान कलम 286 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत.