‘ई-पीक पाहणी’ॲप म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट सहभागाचे; स्वत:चे पीक-पेरणी स्वत: नोंदविण्याचे स्वातंत्र्य : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 20 – देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 2021 पासून ‘ई पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर राबविण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनांच्या लाभासाठी त्यात ठिबक सिंचन असो वा तुषार सिंचन योजना, आधारभूत किंमतीवर खरेदी, पीक कर्ज, पीक विमा योजना यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक-पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविण्यासाठीची व शेतकऱ्यांच्या थेट सहभागाची ही मोहिम आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी स्वत:चे पीक-पेरणी स्वत: नोंदविण्याचे स्वातंत्र्य मिळाले, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज शासकीय विश्रामगृह येवला येथे येवला तसेच निफाड तालुक्यातील कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ई पीक पाहणी मोबाईल अॅप व कार्यशाळेचे उदघाटन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. या बैठकीस आमदार किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, प्रांतअधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ.उन्मेष देशमुख, तलाठी कमलेश पाटील, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर, संतोष खैरणार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या ई-पीक पाहणी ॲपमुळे पीक विमा व कृषी विभागातील लाभ, शेतीसाठी पीक कर्ज पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना सुलभरीत्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या ॲपमुळे हमी भावाने शेतमाल विक्री तसेच सातबारा उतारा काढणे अगदी सुलभ होणार असून, पिकांच्या नोंदणीची सर्व माहिती शासनाकडे असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केल्यास त्यांची चुकीच्या नोंदणीतुन सुटका होवून, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झाल्याने पिकांच्या उत्पादनांची माहिती सहजरित्या राज्य शासनास उपलब्ध होणार असल्याने खरेदी, विक्री व आयात, निर्यात याबाबत नियोजन करणे शक्य होणार आहे. हे ॲप शेतकरी व राज्यशासनाच्या देखील उपयोगात येणार आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
कोरोना सद्यस्थितीचा घेतला आढावा
येवला तसेच निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आढावा घेतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून काही ठिकाणी रूग्ण आढळून येत आहे. अशा ठिकाणी त्वरीत प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे रूग्णांचा शोध घेवून बाधितांना ताबडतोब उपचारार्थ रूग्णालयात दाखल करावे. नागरिकांना दुसरी लस देतांना त्यात सरमिसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या लसीचा पहिला डोस दिला असेल त्याच लसीचा दुसरा डोस देण्याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सुचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.