स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून एनएमआयसीच्या संकुलात व्हिंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन….
भारतभरातील चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानाचे एनएमआयसीकडून प्रदर्शन, चित्रपट रसिकांचे आमच्याकडून पुन्हा एकदा स्वागत, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुंबई, 13 मार्च 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून एनएमआयसीच्या संकुलात आज व्हिंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन एनएमआयसीने व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI) च्या सहकार्याने आयोजित केले आहे.
यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर म्हणाल्या की 75 व्हिंटेज कार्स आणि बाईक्सचा अतिशय सुंदर संग्रह आजच्या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
आज आपल्याला जे स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे ते मिळवून देण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी किती संघर्ष आणि त्याग केला त्याची आठवण करून देणारे हे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
अभिनेता अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांनी देखील अतिरिक्त सचिवांसोबत या प्रदर्शनाला भेट दिली.
या संग्रहालयाच्या संकुलात उभारलेल्या एका सेल्फी पॉइंटचे यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महामारीमुळे बराच काळ बंद राहिल्यानंतर आता महामारीचे निर्बंध शिथिल केल्यावर भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाला (NMIC) अभ्यागतांचे स्वागत करण्याची देखील एक संधी उपलब्ध झाली. यामुळे चित्रपटरसिक आणि चित्रपटांचे हौशी चाहते यांच्यामध्ये मोठा उत्साह पसरला आहे. भारतीय सिनेमाचा समृद्ध भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य साजरे करणाऱ्या अनेक चित्रपटांची प्रेक्षक प्रशंसा करतील.
महामारीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यावर अलीकडेच या संग्रहालयात पुन्हा अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला.
हे संग्रहालय जनतेसाठी मंगळवार ते रविवार दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले आहे, तर त्याची तिकिट खिडकी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल. सोमवारी आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी संग्रहालय बंद राहील.
या संग्रहालयाविषयी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर म्हणाल्या की या संग्रहालयात गेल्या काही वर्षातील भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या कामगिरीचे दर्शन घडते.
“भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2019 मध्ये करण्यात आले होते. महामारीमुळे संग्रहालय पाहणाऱ्यांना आणि चित्रपट रसिकांना बराच काळ एनएमआयसीपासून दूर रहावे लागले. पण आता आम्हाला पुन्हा एकदा येथे लोकांचे स्वागत करायचे आहे. हे संग्रहालय संपूर्ण भारतातील दिग्गजांचे योगदान प्रदर्शित करते आणि उपकरणे आणि परस्परसंवादी माध्यम अभ्यागतांना संपूर्णपणे यामध्ये गुंतवून ठेवते. संग्रहालयाचे वेळोवेळी अद्ययावतीकरण होत राहील आणि चित्रपट विश्वात भर पडत राहील. आपल्या चित्रपटांना खूप जुनी परंपरा आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात 13 भाषांमध्ये चित्रपट बनवले जात आहेत. हा वारसा आणि आपल्या चित्रपट क्षेत्राची समृद्धी एनएमआयसीच्या माध्यमातून प्रदर्शित करणे आम्हाला शक्य झाल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
हे संग्रहालय इतके वैशिष्ट्यपूर्ण का आहे याची माहिती एनएफडीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी दिली.
“आगामी काळात हे संग्रहालय इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणून उभे असल्याचे तुम्हाला दिसून येईल. जगातील सर्वोत्तम संग्रहालयांच्या तोडीस तोड अशा प्रकारची या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे आणि सध्या आशियामधील हे सर्वोत्तम संग्रहालय आहे. या संग्रहालयात असलेला अतिशय मौल्यवान ठेवा आणि दुर्मिळ संग्रह यामुळे हे संग्रहालय इतरांपेक्षा अधिकच महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ते चित्रपट निर्मात्यांना वेगळी उर्जा प्रदान करते आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना पुन्हा भूतकाळातील आठवणींच्या सफरीवर घेऊन जाते.”
व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नीतीन डोसा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, एनएमआयसी सोबत भागीदारी करणे आमच्यासाठी अतिशय सन्मानजनक आहे आणि त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संग्रह करण्याची आणि त्याचे प्रदर्शन करण्याची आम्हा दोघांचीही भावना मिळतीजुळती आहे. आम्ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सर्व वाहने आणि संबंधित साहित्याचे प्रदर्शन करतो. व्हीसीसीसीआय काळजीपूर्वक आणि कुशल ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देते आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे हे आपले कर्तव्य आहे. आमच्या क्लबच्या सदस्यांना येथे आमंत्रित केल्याबद्दल आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की एनएमआयसी सोबतचे आमचे फलदायी संबंध सुरू राहतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा.”
अभिनेते अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक यांच्यासोबत एनएमआयसीची माहिती देत सफर घडवण्यात आली.
यावेळी बोलताना अभिनेते अक्षय कुमार म्हणाले, “इथे आल्यानंतर मी खरोखच भारावून गेलो आहे. एनएमआयसीसोबत असण्याची भावना अतिशय आनंददायी होती. मी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट पाहत मोठा झालो आहे आणि प्रत्येकाने हे भव्य चित्रपट संग्रहालय येऊन पाहावे. जर याविषयी आणखी काही बोलायचे झाले तर मी असे सांगेन की हे स्थान एखाद्या चित्रपट निर्मात्यासाठी अतिशय पवित्र, पूजनीय स्थान आहे कारण दिग्गज चित्रपट निर्मात्यांचे कार्य येथे अतिशय सन्मानाने संग्रहित केले आहे आणि त्याचे अतिशय उत्तम पद्धतीने प्रदर्शन केले जात आहे.”
अभिनेत्री कृती सॅनन म्हणाली,“ हे संग्रहालय पाहिल्यावर मी खूपच प्रभावित झाले, त्याची मांडणी इतकी सुंदर आणि मोहक आहे आणि मला हे माहितच नव्हते की चंद्रलेखा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट आहे जो संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाला आणि 1940 च्या दशकात प्रदर्शित झालेला हा सर्वात महागडा चित्रपट होता, ज्या चित्रपटाने दक्षिण भारतीय निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांचे उत्तर भारतात मार्केटिंग करण्यासाठी प्रेरित केले. त्यातही बालकांचा विभाग असलेला मजला माझा अतिशय आवडता होता, जो विविध प्रकारच्या प्रत्यक्ष सहभागांच्या कृतींवर आधारित होता आणि त्यामध्ये पूर्णपणे रममाण करून टाकणारा होता.”
एनएमआयसीमध्ये पुरातन मौल्यवान वस्तूंचा विपुल संग्रह आहे. यामध्ये शिवाजी गणेशन यांनी “वीरा पांड्या कट्टाबोम्मम” या चित्रपटात घातलेले चिलखत आणि “आदिमाई पेन्न” या चित्रपटात एम जी रामचंद्रन यांनी घातलेला लाल कोट यांच्यासह चित्रपटांची प्रॉपर्टी, जुनी सामग्री, पोस्टर्स, महत्त्वाच्या सिनेमांच्या प्रती, प्रमोशनल लीफ्लेट्स, गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका, ट्रेलर्स, ट्रान्स्परन्सीज, जुन्या काळातील चित्रपट नियतकालिके, चित्रपट निर्मिती आणि वितरण यांची माहिती देणारी आकडेवारी इ. या संग्रहालयात अतिशय नीटनेटक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे आणि त्यातून भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे घटनाक्रमानुसार दर्शन घडत आहे.
भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाविषयी (NMIC) –
हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. एक आहे न्यू म्युझियम बिल्डिंग आणि दुसरी 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल, या दोन्ही इमारती मुंबईतील चित्रपट प्रभागाच्या संकुलात आहेत.
न्यू म्युझियम बिल्डिंगमध्ये चार प्रदर्शन सभागृहे आहेत ज्यामध्ये आहेत:
- गांधी आणि सिनेमा: या कक्षात केवळ गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेलेच चित्रपट नाहीत तर त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या सिद्धांतांचा चित्रपटांवर पडलेला सखोल प्रभाव दाखवणारे देखील चित्रपट आहेत.
- बालकांचा फिल्म स्टुडियो: यामुळे अभ्यागतांना विशेषतः बालकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि चित्रपटनिर्मितीच्या कलेबाबत माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध होते. चित्रपटांशी संबंधित कॅमेरा, लाईट, चित्रिकरण, अभिनयाचा अनुभव या सर्व बाबींचा संवादात्मक अनुभव घेता येतो. त्याचबरोबर क्रोमा स्टुडियो, इमर्सिव एक्स्पिरिअन्स झोन, स्टॉप मोशन ऍनिमेशन स्टुडियो, व्हर्चुअल मेकओव्हर स्टुडियो यांचाही आनंद घेता येतो.
- तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि भारतीय सिनेमा: या कक्षात भारतीय चित्रपट निर्मात्यांनी रुपेरी पडद्यावर सिनेमॅटोग्राफिक प्रभाव निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या केलेल्या सर्जनशील वापराचे दर्शन घडते.
- भारतातील सिनेमाची व्याप्ती: भारतभरात सर्वत्र सळसळत्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या चित्रपट संस्कृतीच्या जादुई प्रभावाचे या कक्षात दर्शन घडते.
गुलशन महल ही एक एएसआय श्रेणी-II ची पुरातन वारसा वास्तू असून तिचे एनएमआयसी प्रकल्पाचा भाग म्हणून पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या ठिकाणी भारतीय सिनेमाचा 100 वर्षांचा प्रवास प्रदर्शित करण्यात आला आहे. याची मुख्यत्वे 9 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सिनेमाचे मूळ, सिनेमाचा भारतात प्रवेश, भारतीय मूक चित्रपट, ध्वनीचे आगमन, स्टुडियोचे युग, दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव, सर्जनशील अनुनाद, नवी लाट आणि प्रादेशिक सिनेमाच्या पलीकडे असे हे विभाग आहेत.