संजय राऊत मालिकांची पाठराखण का करत आहेत? चित्रा वाघ यांचा सवाल
मुंबई
जनाब संजय राऊत, तुम्हाला समीर वानखेडे हे अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नसून मुसलमान आहेत हे सिद्ध करणार्यांची पाठराखण करण्याची एवढी घाई का लागलेली आहे असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. राज्यात इतरही गंभीर प्रश्न असून त्याकडेही लक्ष द्या असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला आहे.
सध्या क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरण राज्यातच नाही तर देशात गाजत असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. महाविकास आघाडीमधील नेते विशेषत: अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग-ेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या एकूणच कार्यप्रणालीवर सातत्याने बोलत आहेत. पत्रकार परिषदेतूनही ते पुरावे देत आहेत. या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नवाब मलिक यांची पाठराखण करताना दिसत आहेत. हा मुद्दा उपस्थित करून चित्रा वाघ यांनी विविध प्रश्नांचा भडिमार संजय राऊत यांच्यावर केला आहे.
कोकणातील वादळग-स्तांना मोबादला मिळत नाही. शेतकर्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकर्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय. रोज राज्यातील लहान मुली, महिला यांवर लैंगिक अत्याचार होताहेत. या सगळ्या विषयांवर भाष्य करायचे सोडून संजय राऊत यांना एनसीबी सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकार्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं, त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर लावला आहे.
नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांना विरोध करणार्यांची डोकी फोडली जातात आणि तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणार्यांवरच कारवाई करते. यावर संजय राऊत गप्प का? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत हे नवाब मलिकांच्या नजरेतून हिंदुस्तान बघत असून न्यायालयीन प्रकरणावर अशा गलिच्छ पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा मी धिक्कार करते असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.