सुपरस्टार रजनीकांत फाळके पुरस्कार स्वीकारताना भावूक आणि आनंदीही
मुंबई,
सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी 2020 साठीचा 51 वा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जात असून या प्रसंगी आपल्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. रजनीकांत म्हणाले हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घेताना माझे गुरु केबी म्हणजे के बालचंदर सर आपल्यात राहिले नाहीत याचे दु:ख आहे. तर हा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही आहे. या पुरस्काराची घोषणा गेल्या एप्रिल मध्ये केली गेली होती. केंद्राने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने 1969 मध्ये या पुरस्काराची सुरवात केली आहे.
रविवारी दिल्ली येथे दाखल झाल्यावर बोलताना रजनीकांत म्हणाले, मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार लोकांचे प्रेम आणि समर्थनाचे प्रतिक आहे. हा दिवस आणखी एका कारणाने महत्वाचा आहे कारण सोमवारी रजनीकांत यांची सुकन्या सौंदर्या हिने विकसित केलेले देशातील पहिले आवाज आधारित सोशल मिडिया अॅप लाँच होते आहे. हे अॅप सर्वच जनतेला खुपच उपयुक्त आहे. सोमवारी रजनीकांत स्वत:च्या आवाजाने या अॅप ची सुरवात करणार आहेत.
रजनीकांत यांनी 1975 मध्ये चित्रपट करियरची सुरवात केली असून त्यांचा पहिला चित्रपट होता अपूर्व रंगगल. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. रजनीकांत यांचा ‘अन्नाये’ हा नवा चित्रपट दिवाळीत 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. रजनीकांत यांना यापूर्वी 2000 साली पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरविले गेले आहे.