उद्या खासदार भावना गवळी यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

मुंबई,

गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या यवतमाळ – वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना दुसरे समन्स बजवण्यात आले आहे. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात 20 ऑॅक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. उद्या भावना गवळी उपस्थित राहतील का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार भावना गवळी यांच्या वाशिममधील महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील कर्मचार्‍याची आणि त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांची त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी 12 ऑॅक्टोबरला चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्रस्टच्या प्रमुख गवळी यांच्याकडे चौकशी केली जाईल. त्यांचा सहकारी सईद खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्याकडील चौकशीतून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याबाबत गवळी यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.

ईडीने समन्स काढून 4 ऑॅक्टोबरला हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, भावना गवळी यांनी गैरहजर राहत 15 दिवसांचा अवधी मागून घेतला. त्यामुळे ईडीने ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी अन्य पुरावे व जबाब मिळविण्यावर भर दिला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी, तसेच शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीच्या देणग्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काय आहे प्रकरण?

खासदार भावना गवळी यांच्याविरुद्ध हरीश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची स्थापना करून राज्य सरकारच्या हमिपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून 43 कोटींचे कर्ज मिळविले. 2002 मध्ये गवळी यांनी या कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!