आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी – कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 12 :
डहाणू आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पाबाबत वन हद्दीतून जाणाऱ्या अतिउच्च वीज दाब वाहिनीस परवानगी मिळण्यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करण्यात यावी. वसई, विरार मधील चार आणि डहाणूमधील एका गावात वीज वितरणाच्या कामास मंजूरी देऊन, आदिवासी भागात १०० टक्के विद्युत पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आदिवासीबहुल भागाचा विकास जलदगतीने करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात पालघर, डहाणू, जव्हार, वसई, विरार वीजपुरवठा, वीज उपकेंद्र उभारणे, किल्ल्यांची डागडुजी आदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामांची गती वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले. या बैठकीस पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, महापारेषणचे मुख्य अभियंता पीयुष शर्मा, पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ, महावितरणचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर, वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील डहाणू उपकेंद्र ते सुर्यानगर कवडास आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पासंदर्भात वन हद्दीतून जाणाऱ्या अतिउच्च वीज दाब वाहिनीच्या परवानगी संदर्भात वन विभागाने पुढील आठ दिवसात कार्यवाही करावी, आणि हे उपकेंद्र उभारण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीने जलदगतीने कामे पूर्ण करावी.
पालघर आणि जव्हार पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करावयाचे आहे. आदिवासीबहुल गाव आणि पाड्यात १०० टक्के वीज वितरण होणे गरजेचे आहे. ज्या गावात कामे सुरू आहेत त्या कामांची गती वाढवावी आणि डहाणूमधील एक गाव व वसई, विरार मधील ४ पाड्यांमध्ये वीज वितरणास संबंधित विभागाने मान्यता द्यावी, जेणेकरून आदिवासीबहुल क्षेत्रात १०० टक्के विज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. डहाणू आणि वसई, विरार क्षेत्रातील मंजुर आणि प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कामांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही श्री.भुसे यांनी निर्देश दिले.
जव्हार क्षेत्रात सिमेंट नाला बांधकामास मान्यता द्यावी. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात यावीत. डहाणू येथील सिमेंट बंधारे कामाचा प्रस्ताव सादर करावा. बंधारे बांधताना शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा व्हायला हवा अशा पद्धतीने कामे करण्याचे निर्देश श्री.भुसे यांनी दिले. कोहज किल्ल्याची डागडुजी आणि सुशोभीकरणाचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.भुसे यांनी दिले.