शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली, ’या’ ठिकाणी होणार मेळावा?
मुंबई,
शिवसैनिकाचे लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार आहे.गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावापार पडणार आहे.
षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार असून, 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचं संकट जरासे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑॅनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.
ठाकरे कुटुंबिय आणि शिवाजी पार्क यांच्यातील नाते
ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा 27 नोव्हेंबर 1966 रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता, तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना सेनेची जबाबदारी दिली, त्याचे हे मैदानही साक्षीदार आहे. त्याच बरोबर 1995 मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. 2015 साली एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनिप्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तेव्हा शिवसेनेकडून या सभेत 60 डिग-ीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही, त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या मात्र पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मात्र राज्यात युतीचे सरकार होते, त्यामुळे दशहरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले. ठाकरे कुटुंबाच्या आनंदाचे हे मैदान जसे साक्षीदार बनले, तसे 2012 साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दु:खाचेही साक्षीदार बनले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर याच मैदानात अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यावेळी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक या मैदानात जमले होते.