केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरी गणरायाचं आगमन; म्हणाले, आम्हाला कोरोना शिवाय जगायचंय!
मुंबई,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यावर आणि देशावर आलेलं कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे, असं साकडं मंत्री नारायण राणे यांनी बाप्पाला घातलं. यासोबतच ‘आम्हाला कोरोना शिवाय जगायचं आहे, कोरोना सोबत नाही‘ असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी लगावला. बाप्पाच्या प्रतिष्ठापना नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच राज्य सरकारने गणेशोत्सव काळात लावलेल्या निर्बंधावरही त्यांनी टीका केली. गणेशोत्सव काळात राज्य सरकारने ज्या प्रकारे निर्बंध लावले, ते नियोजन अयोग्य असल्याचे यावेळी ते म्हणाले.
केवळ हिंदूंच्या सणांवर निर्बंध –
महाविकास आघाडी सरकार हे केवळ हिंदूंच्या सणांवर निर्बंध आणत आहे. हिंदुत्त्वाचा आव आणणारी शिवसेनेचे हिंदुत्त्व संपले आहे. भारतीय जनता पक्षाशी युती तोडल्यानंतरच शिवसेनेचे हिंदुत्त्वाची नातं तुटलं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आल्यास स्वागत –
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले नाही तरी चालेल, असे वक्तव्य केले होते. मात्र, आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस 9 ऑॅक्टोबर ठरला असून यावेळी मुख्यमंत्री उद्घाटनाला आल्यास त्यांचे स्वागत करू, अशी भूमिका नारायण राणे यांच्याकडून घेण्यात आली. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाला येण्यात भारतीय जनता पक्षात कोणतेही दुमत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लुकआऊट नोटीस बाबत करणार कायदेशीर कारवाई –
नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे गुन्हे शाखेकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, याबाबत आपण संबंधित बँकेत सोबत संपर्क केला असून बँकेकडून घेतलेल्या 25 कोटींच्या कर्जाची रक्कम आपण पूर्वीच अदा केलेली आहे. 25 कोटी रुपयांवरील व्याजाच्या रकमेबाबत बँकेची बोलणं सुरू असून लवकरच बँकेसोबत तडजोड केली जाणार आहे. व्याजाच्या रकमेबाबत एक वर्ष आधीचं आपण बँकेला पत्र देऊन तसं कळवलं होतं. त्यामुळे राणे कुटुंबीयांना पाठवण्यात आलेल्या लुकआउट नोटीसबाबत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितले.