चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, राणे यांचा सवाल
मुंबई,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑॅक्टोबरपासून सुरु होणार आहे. याबाबत केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहिजे कशाला, असा थेट सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
चिपी विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री राणे यांनी दिली. मात्र, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना प्रत्येक कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असावेत हे गरजेचे नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे संकेत दिलेत.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे 9 ऑॅक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमात माझ्यासह स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असतील, असे राणे स्पष्ट केले. दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून अशाच पद्धतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर राणे यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे, राणे आणि शिवसेनेत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
7 ऑॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन करतील. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला यासंबंधी अधिकार्यांना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी घोषणा सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन श्रेयवाद उफाळण्याची शक्यता आहे.
2014 महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाल्याचा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला. विमानतळाचे उद्घाटन केले जात असेल तर त्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाशी समन्वय साधणे गरजेचे आहे, असे बोलही राणे यांनी शिवसेनेला सुनावले.