कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता

मुंबई, दि. ६ :

कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला.

यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही  कॅमेरे लावले जातील.  यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.

कांदळवनाचे जतन कराकांदळवन वृक्ष लागवड करा

आज वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  याच बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी अशा सूचनाही दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेले निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी असेही ते यावेळी म्हणाले.

नियामक मंडळाच्या बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, महाराष्ट्र कांदळवन आणि सांगरी जैविविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वडाळ्यात कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र

एमएमआरडीएने एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी  दिला  असून त्यातून  भक्ती पार्क, वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.  यासाठी निविदेद्वारे काम करण्यासाठी सर्वात कमी दर असलेल्या मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास करण्याच्या प्रस्तावासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षांचा आहे.  यासाठी कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

इतर महत्वाचे निर्णय

कांदळवन प्रतिष्ठानच्या २०२१-२२ साठीच्या ३० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठीच्या २५ कोटी रुपयांच्या खर्चास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

याबरोबर ऐरोली येथील शोभिवंत मत्स्य उबवणी केंद्रात अधिक तांत्रिक सुधारणा करण्याकरिता एनबीएफजीआरला तीन वर्षाची मुदतवाढ, कोपरी- ठाणे येथे विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक यांच्या कार्यालयाच्या व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम करण्यास मान्यता, ऐरोली येथील प्रतिष्ठानच्या कार्यालयात माहिती फलक आणि दिशादर्शक लावणे असे विविध निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आले.

सागरी जीव बचावासाठी वाहन खरेदी

संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या क्षेत्र संचालकांनी दिलेल्या ७ सागरी जीव बचाव वाहन खरेदी व यापोटी येणाऱ्या १ कोटी  ७५ लाख रुपयांच्या खर्चासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वाहने किनारी भागातील सागरी जीवांच्या जसे की सागरी कासव, डॉल्फिन, इ. च्या बचावासाठी वापरण्यात येतील. डहाणू, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग अशा ठिकाणी  ही वाहने  कार्यरत राहतील.  ही वाहने खरेदी करतांना मुंबई आणि ठाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करावी अशा  सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

कांदळवन संवर्धनात लोकसहभाग व जनजागृती

इनरव्हील संस्था आणि कांदळवन प्रतिष्ठानचे व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व  यातून  शाळा, महाविद्यालये, किनारीभागात आणि प्रतिष्ठानच्या कार्यालयात कांदळवनांचे संरक्षण, त्याचे महत्त्व समजून सांगून कांदळवन संवर्धनात विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सहभाग मिळवण्याचे काम सुरु आहे. यासाठी व्याख्यानांचे आयोजन, पालघरमध्ये निसर्ग पर्यटन विकास, कांदळवन स्वच्छता, स्वंयसेवकांचे प्रशिक्षण, कांदळवन रोपवाटिका  असे विविध प्रकारचे काम हाती घेण्यात आले आहे.

भांडूप येथे निसर्ग पर्यटन क्षेत्र

कांदळवन प्रतिष्ठानतर्फे भांडुप पंपिंग स्टेशन नजीकचा ठाणे खाडीचा भाग निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे माहिती फलक आणि दिशा दर्शक लावण्याचे काम सुरु आहे.  निसर्ग प्रेमी आणि पक्षी निरीक्षकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.  याठिकाणी पर्यटकांना जैवविविधतेचे महत्त्व आणि त्याअनुषंगिक माहिती पुरवण्यासाठी हे माहिती आणि दिशा फलक उपयुक्त ठरणार आहेत.

बैठकीत कांदळवन प्रतिष्ठानने सागरी व किनारी जैवविविधतेच्या संवर्धन कार्यात लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना कांदळवन प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची कोस्टवाईज उत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यात आली.  याशिवाय कांदळवन प्रतिष्ठानसमवेत सुरु असलेल्या काही संशोधन प्रकल्पांना मंजूरी, अनुदानित प्रकल्पांना मुदतवाढ यासारखे निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आले.

कांदळवन प्रतिष्ठानची काही महत्त्वाची कामे

  • कांदळवन प्रतिष्ठान ने मागील वर्षभरात १७७३ हेक्टर कांदळवन क्षेत्र कलम चार अंतर्गत राखीव म्हणून घोषित केले आहे. तर ९८०० हेक्टर कांदळवन क्षेत्राची चौकशी पूर्ण करण्यात आली असून कलम २० अंतर्गत अंतिम अधिसुचना निर्गमित करण्यात आली.
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ५०० एकर कांदळवन क्षेत्र वन विभागाने ताब्यात घेतले.
  • ठाणे जिल्ह्यातील १३८७ हेक्टर कांदळवन क्षेत्र महसूल विभागाकडून तर सिडको कडून २८१ हेक्टर कांदळवन क्षेत्र ताब्यात घेतले.
  • मागील वर्षी १६१ हे. क्षेत्रावर कांदळवन रोपवनाची लागवड करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!