विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना एकत्रित करण्याची प्राथमिक जबाबदारी शिक्षकांची; एक चांगला शिक्षक म्हणजे एक व्यक्तिमत्त्व-निर्माता,एक समाज-निर्माता, आणि एक राष्ट्र-निर्माता: राष्ट्रपती कोविंद
मुंबई,
राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना एकत्रित करण्याची प्राथमिक जबाबदारी शिक्षकांवर असते; एक चांगला शिक्षक हा व्यक्तिमत्त्व-निर्माता, समाज-निर्माता आणि राष्ट्र-निर्माता असतो. शिक्षक दिनानिमित्त आज (5 सप्टेंबर 2021) आभासी पद्धतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देशभरातील 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपतींनी पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अभिनंदन केले.भावी पिढी आपल्या योग्य पात्रता असलेल्या शिक्षकांच्या हातात सुरक्षित आहे, हा त्यांचा विश्वास असे शिक्षक दृढ करतात, असे ते म्हणाले. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचेआहे, लोक त्यांच्या शिक्षकांना आयुष्यभर लक्षात ठेवतात, जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपुलकीने आणि मायेने शिकवतात त्यांना नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आदर मिळतो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात सुवर्णकाळ निर्माण करण्याची संकल्पना रुजवण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी योग्यता प्राप्त करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन सक्षम करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षक वर्गाला केले. संवेदनशील शिक्षक त्यांच्या वर्तनाद्वारे ,आचार आणि अध्यापनातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात असे सांगत ते म्हणाले की, शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, प्रतिभा , मानसशास्त्र, सामाजिक पार्श्वभूमी आणि अवतीभवतीची परिस्थिती याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या त्याच्या विशेष गरजा, आवड आणि क्षमतांनुसार सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे.