स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली
मुंबई, दि. 14 :- “महाराष्ट्राच्या राजकारणातलं सदाबहार, हसतमुख, दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेलं. पायाभूत सुविधा उभारताना महाराष्ट्राचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार जाणीवपूर्वक जपला. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. सर्वांना सोबत घेऊन राज्याला पुढं नेणारं सर्वमान्य, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत, पुढे केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा, कठोर परिश्रमांचा होता. या प्रदीर्घ प्रवासात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खांशी समरस होऊन त्यांनी काम केलं. जनतेला मदतीसाठी सहज उपलब्ध होऊ शकणारे ते नेते होते. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य होते. नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. मुंबई महानगराच्या विकासात त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्वप्नातील पुरोगामी, प्रगत, संवेदनशील, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.