खा.डाॅ. शिवाजीराव काळगे यांच्याकडून हायवेची पाहणी- अपघातात गेलेल्या 150 जीवाला जबाबदार कोण? खासदारांकडून अभियंते व गुत्तेदाराची खरडपट्टी..

लातूर प्रतिनिधी –

लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाच्या कालावधी झाला नसतानाही मोठ्या प्रमाणात महामार्गावर भेगा पडून व रस्ता खचून झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी काॅग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले. त्याची दखल घेऊन खा.डाॅ शिवाजीराव काळगे यांनी महामार्गाची पाहणी करून एवढ्या मोठ्या रस्ता खराब झाला असताना प्रशासन मुग गिळून गप्प का? होते. हि फार मोठी शोकांतिका आहे म्हणत अभियंत्याची व गुत्तेदाराची खरडपट्टी काढत 150 जणांचे बळी गेले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.

दोन वर्षापूर्वी रहदारीसाठी खुला झालेला लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता सहा महिन्यातच खचून जाऊन अनेक ठिकाणी मोठ मोठ्या भेगा पडल्या. बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान प्रत्येक एक किमी अंतरावर रस्ता आडवा उभा खचून भेगा पडल्या. अनेक ठिकाणी रस्ता जम्पिंग होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन 150 पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वारंवार नागरीकांतून झाली तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मागच्या दहा दिवसापासून काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस पक्षाच्या वतीने पानचिंचोली ते औराद शहाजानी दरम्यान रस्त्यावरून परीक्रमा आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या दरम्यान हायवे लगतच्या गावातील नागरिकांशी व अपघातात मृत्यू पावलेले व जखमी झालेल्या कुटुंबाला भेटी दिल्या. गावातील नागरिकांच्या सह्याची मोहीम हाती घेण्यात आली. काॅग्रेसच्या आंदोलनाची दखल घेऊन खा.डाॅ शिवाजीराव काळगे यांनी शुक्रवारी बाभळगाव ते निटूर दरम्यान खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाला असताना प्रशासन कोणतेही दखल घेत नाही हि खेदाची बाब असून सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाचे यांना महत्त्व राहीले नाही अशी खंत व्यक्त करत एमएमआरडीए चे अभियंता इंगळे व गुत्तेदार घोरपडे यांना फोनवर संपर्क करुन रस्ता दुरुस्तीची जबाबदारी असताना तुम्ही एवढे बेजबाबदार कसे वागू शकता. तुम्हाला अपघातात मृत्यू पावलेल्या जीवांचे कांही देणेघेणे आहे का नाही असा प्रश्न उपस्थित करत दररोज अपघात होऊन एखाद्याच्या घराला कुलूप लागणे हि खूपच दुःखद घटना आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे अन्यथा लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून पंधरा दिवसात रस्ता दुरुस्ती पुर्ण करु असा शब्द अभियंता इंगळे यांनी खासदारांना दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी प.स सभापती अजित माने, दिनकर निटूरे, बालाजी भूरे, रमेश मोगरगे, बाबुराव शिंदे, गंगाधर चव्हाण अदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरींना भेटणार

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मी बुलडोझर खाली देणार अशी घोषणा केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण कामच निकृष्ट दर्जाचे झाले असून अपघातात जीव जाऊन अनेकांची घरे उघड्यावर आली आहेत. त्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी व संबधितावर कारवाई करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी निलंग्याचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे खासदारांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!