अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्जही ढासळला; तालिबानचा पंजशीरवर पूर्णपणे ताबा

काबूल,

मागील काही दिवसांपासून पंजशीर खोर्‍यात सुरू असलेल्या तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा आज शेवट झाला आहे. तालिबाननं आता पंजशीर खोरंही आपल्या ताब्यात घेतलं आहे, याबाबतची अधिकृत माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबाननं नियंत्रण मिळवलं आहे. 15 ऑॅगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर केवळ पंजशीर हेच तालिबानच्या नियंत्रणात नव्हतं.

पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधात लढा दिला जात होता. पण आता पंजशीर हा अखेरचा बुर्जही तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. यानंतर तालिबाननं पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवला आहे.

दरम्याान काल अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये सालेह यांनी सांगितलं होतं की, ’दोन्ही गटाकडून पंजशीरमध्ये युद्ध सुरूच आहे. ’आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात काही शंका नाही. तालिबान्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानसाठी शेवटपर्यंत लढत राहू. मी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत हे लोकांना आश्वासन देण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे.’

यानंतर आज सकाळपासून तालिबानसमोर नॉर्दन आघाडीची पिछेहाट झाल्याची माहिती समोर येत होती. तसेच पंजशीरमध्ये तालिबानला कडवं आव्हान देणार्‍या संघटनांनी आता शांततेत तोडगा काढण्याचा प्रस्ताव तालिबानसमोर ठेवला होता. पण तालिबाननं युद्धच सुरूच ठेवलं आहे. त्यानंतर आता पंजशीवरवर तालिबाननं पूर्णपणे ताबा मिळवल्याची घोषणा तालिबाननं केली आहे. तसेच तालिबाननं पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवत विजयी घोषणा दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!