पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीत ‘कॅच द रेन’ तत्त्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व.मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ राबविणार

मुंबई, दि. 19 : उन्हाळ्यातील 3 ते 4 महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या राज्यातील गावे/ वाड्या-वस्त्या यांच्यासाठी पाण्याची साठवणूक करून पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ या नावाने सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्यात सुमारे 42.5 टक्के क्षेत्र (173 तालुके) हे अवर्षण प्रवण (टंचाई ग्रस्त) क्षेत्र आहे. राज्याची भौगोलिक रचना लक्षात घेता मोठ्या प्रमाणात भूजल उपलब्धता हंगामी स्वरूपाची असते. ज्यामुळे राज्यातील अनेक गावे/ वाड्या/ वस्त्यांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये पडणाऱ्या पावसा पैकी 70% पाणी वाहून जाते व बाष्पीभवन होते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना म्हणून “कॅच द रेन” या तत्त्वावर नव्याने योजना अस्तित्वात आणणे गरजेचे होते. म्हणून ‘कॅच द रेन’ बाबतीत धोरण ठरविण्यासाठी संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालानुसार नवीन योजना करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. त्यानुसार “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

ही योजना किमान 50 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावे/ वाड्या/ वस्त्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेद्वारे पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी उन्हाळ्यापर्यंत साठवण टाकीत साठवून ठेवून शुद्धीकरणाची प्रक्रिया करून पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!