पीएम किसान योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा आठवा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ किमान हमीभावानुसार यंदा शेतकऱ्यांकडून विक्रमी गहू खरेदी सरकार कोविड-19 विरुध्द पूर्ण ताकदीनिशी लढा देत आहे- पंतप्रधान

नवी दिल्ली, 14 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरीत करण्यात आला. आज एकाच वेळी या योजनेच्या 9,50,67,601 लाभार्थ्यांच्या खात्यात 2,06,67,75,66,000 रुपये निधी थेट जमा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. केंद्रीय कृषीमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांशी बोलतांना पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील उन्नाव च्या अरविंद या शेतकरी बांधवाचे कौतुक केले. आपल्या प्रदेशातील युवा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आणि शेतीसाठी नवे तंत्रज्ञान शिकवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अंदमान-निकोबार बेटांवरील कार निकोबारचे पॅट्रीक मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती करतात, त्यांचाही पंतप्रधानांनी गौरव केला. आंध्रप्रदेशातील अनंतपूर इथल्या एन वेणुरामा यांनी आपल्या परिसरातल्या 170 पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे, असे सांगत, त्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

मेघालयचे रँवित्झर मेघालयातील डोंगराळ भागात आले, हळद, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पिकांचे उत्पादन करतात. त्यासोबतच, पंतप्रधानांनी श्रीनगरच्या खुर्शीद अहमद यांच्याशीही संवाद साधला. अहमद, शिमला मिरची, मिरची, आणि काकडी अशा फळभाज्यांची सेंद्रिय शेती करतात.

पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील अडचणींवर मात करत अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला यांचे विक्रमी उत्पादन केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारही दरवर्षी किमान हमीभावानुसार धान्यखरेदी करण्याचे नवनवे विक्रम रचत आहे, असे मोदी म्हणाले. किमान हमीभावानुसार धान खरेदीचा विक्रम याआधीच झाला आहे. आणि आता गहू खरेदीचाही नवा उच्चांक निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. यंदा आतापर्यंत हमीभावानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत, 10 टक्के अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत गहू खरेदीची 58,000 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

केंद्र सरकार शेतीमध्ये नवीन उपाय योजना आणि नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा सातत्याने  प्रयत्न करत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हा देखील अशा प्रयत्नांपैकी एक आहे. सेंद्रिय शेतीमुळे अधिकाधिक नफा मिळतो आणि आता देशभरातील तरूण शेतकरीही याकडे वळले आहेत. ते म्हणाले की, आता गंगा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांवर  आणि सुमारे 5 किलोमीटर परीघ क्षेत्रात सेंद्रिय शेती केली जात आहे, जेणेकरून गंगा नदी स्वच्छ राहील.

या कोविड महामारीच्या काळात किसान क्रेडिट कार्डची मुदत वाढवण्यात आली असून आता 30 जूनपर्यंत हप्त्यांचे नूतनीकरण करता येईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत 2 कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डे जारी करण्यात आली आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, शतकातून एकदा येणाऱ्या महामारीने संपूर्ण जगासमोर आव्हान उभे केले असून आपल्यासमोर हा अदृश्य शत्रू आहे. ते म्हणाले की, सरकार कोविड -19 विरुद्ध आपल्या सर्व सामर्थ्यानिशी लढा देत आहे आणि प्रत्येक सरकारी विभाग राष्ट्राच्या वेदना दूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत आहे.

अधिकाधिक देशवासियांचे वेगाने लसीकरण करता यावे यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, आतापर्यंत देशभरात सुमारे 18 कोटी लसींच्या मात्रा  देण्यात आल्या  आहेत. देशभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये  मोफत लसीकरण केले जात आहे. प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी आणि नेहमी कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ते पुढे म्हणाले की, ही लस कोरोनापासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे आणि यामुळे गंभीर आजाराचा धोका कमी होईल.

पंतप्रधान म्हणाले की, या कठीण काळात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दल पूर्ण ताकदीने काम करत आहे.  रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या चालवत आहे. देशातील औषध निर्मिती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर  औषधांचे उत्पादन आणि वितरण करत आहे. औषधे व वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची विनंती पंतप्रधानांनी राज्य सरकारांना केली.

भारत हा कठीण परिस्थितीत आशा सोडून देणारा देश नाही, असे सांगत  पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की या आव्हानावर पूर्ण सामर्थ्याने आणि समर्पित भावनेने मात होईल. त्यांनी ग्रामीण भागातही कोविड -19 चा प्रसार होत असल्याबाबत इशारा दिला आणि ग्रामपंचायतींना आपापल्या भागात योग्य जागरूकता व स्वच्छता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!