रशियाच्या राजधानीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक! 24 तासात आढळले 40 हजारांहून अधिक नवीन रुग्ण

मॉस्को,

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दरम्यान या संकटातून जग काहीसे सावरत होते, तर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. चीनच्या पाठोपाठ आता रशियाच्या राजधानीत देखील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत रशियामध्ये 40 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर 1159 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुतिन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मॉस्कोमध्ये 11 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियामधील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ गुरुवारपासून (28 ऑक्टोबर) बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाच्या 85 प्रदेशांमध्ये जेथे परिस्थिती विशेषत: गंभीर आहे, तेथे आधी काम थांबविले जाऊ शकते आणि सुट्ट्या 7 नोव्हेंबरच्या पुढे वाढवल्या जाऊ शकतात. या काळात, बहुतेक सरकारी संस्था आणि खाजगी व्यवसायांना देखील काम थांबवावे लागेल, मुख्य पायाभूत सुविधा आणि काही इतरांना वगळता.

चीन देखील कोरोनामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. त्यामुळे चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीनने कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून आता तर एका अख्ख्या शहरातच चीनने लॉकडाउन लागू केला आहे. चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास 40 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित पुन्हा वाढू लागल्याचे समोर आल्यानंतर चीनने एक मोठा निर्णय घेतला. चीनने या संपूर्ण शहरात कठोर लॉकडाउन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!