विकासकामात कुचराई करणार्यांवर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश
चंद्रपूर प्रतिनिधी
30 जुलै
सावली तालुक्यात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर विकास कामे तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी गांभीर्याने काम करावे. स्थानिक लोकांच्या अ़डीअडचणी सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे जे अधिकारी – कर्मचारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. सावली तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सभापती विजय कोरेवार, राकेश गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, नितीन गोहणे, राजू सिदम, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी निखिल गावडे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कटरे, विद्युत वितरणचे उपअभियंता श्री. खरकटे, जि.पचे बांधकाम उपअभियंता श्री. गोगंले प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले की ,जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पावसाळ्यात कोणताही अधिकारी गैरहजर राहत असेल किंवा सेवा बजावत नसेल व अशा कारणाने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
पावसाळ्यात मोठमोठी झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो तसेच जिवितहानी सुद्धा होऊ शकते. यासाठी वीज वितरण विभागाने पावसाळ्यात सतर्क राहून काम करावे. तसेच जिल्ह्यातील ग-ामपंचायतींना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले होते. सदर कामांना दिलेला निधी, ठरावाअभावी खर्च होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी स्वत: लक्ष घालून सदर कामे पूर्णत्वास न्यावी. विकास कामांना खिळ बसता कामा नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांना तसेच गरजू निराधारांना अन्नधान्याचे वाटप वेळोवेळी करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सावली तालुक्यात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या कडेची फिलिंग भरण्यात आली नाही. त्यामुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेची फिलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावी. तसेच पावसाळ्यात डेंगू मलेरिया यासारख्या साथरोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यासाठी स्वास्थ केंद्रात उपलब्ध असलेल्या औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता त्यासोबतच कोरोना काळात सावली तालुक्यातील नागरिकांचे कितपत लसीकरण करण्यात आले, याची प्राथमिक माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. ज्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या होतील त्या जागेवर दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ति होईपर्यंत सदर अधिकार्यांना कार्यमुक्त करू नये, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले