खळबळ! करुणा मुंडेंच्या गाडीत आढळले पिस्तूल, धनंजय मुंडेंच्या घातपाताची शक्यता?

बीड

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.

कोण आहेत करुणा मुंडे?

करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच रेणूने टिवट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्माने गंभीर आरोप केले होते. यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत, या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.

काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा या संपत्तीपासून सामाजिक आणि राजकीय विषयावर कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत ’मी परळीमध्ये येणार आहे. तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे’, असं सांगितलं. यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

धनंजय मुंडेंचा घातपात?

म्हटल्याप्रमाणे करुणा परळीत आल्या. यानंतर त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तूल आढळला. त्यामुळे धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

करुण मुंडेंच्या विरोधात शेकडो महिला रस्त्यावर

तर, परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आणि शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच, पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी महिलांनी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

’करुणा मुंडेंपासून माझ्या जीवाला धोका आहे. ती नेहमी धनंजय मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार यासारखी भाषा वापरत आहे’, असे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात तसेच फेसबुकवरील आपल्या खुलाशात देखील म्हटले होते.

वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वत: करुणा यांनीच जाहीर केले होते. तेव्हा बेकायदेशीर रित्या बाळगलेले पिस्तूल घेऊन करुणा मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या? या सवालाने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!