अजिंठा लेणी परिसरात झकास पठार उपक्रम राबवा – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद प्रतिनिधी
दि.21 : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड इको बटालियनच्या सहाय्याने करावी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या झकास पठार उपक्रम अजिंठा लेणी परिसरात राबवावा, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर लेणी परिसरातील विविध समस्यांवर चर्चा करत अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याबाबत निर्देश दिले.
अजिंठा लेणी परिसरात वृक्ष लागवड करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्री. सत्तार बोलत होते. या बैठकीस आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उप वनसंरक्षक अरूण पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.एन. गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, पुरातत्त्व विभागाचे डॉ. किशोर सोलापूरकर, पर्यटन विकास महामंडळाच्या अंजली बडवे, अजिंठ्याचे क्षेत्रीय वनाधिकारी एस.पी. मंगदरे आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री सत्तार म्हणाले, अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या ठिकाणी वनाच्छादन मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. सध्या व्ह्यू पॉइंटवरून अजिंठा लेणीचे दृश्य काही प्रमाणात उजाड दिसते. हा परिसर हिरवागार करण्यासाठी कृषी, वन, पर्यटन विभागाने एकत्र येत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी इको बटालियनचे साहाय्य घेण्यात यावे. अजिंठा लेणी परिसरात बहावा, पळस, ताम्हण आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. सत्तार यांनी दिल्या.
कोकणाच्या धर्तीवरील ग्राम पर्यटन विकासाप्रमाणेच अजिंठ्याचा विकास करावा. पर्यटन विकास महामंडळाने व्ह्यू पॉइंटवरील पाण्याच्या व्यवस्थेबाबत आणि पाणी वापराबाबतचा प्रस्ताव तात्काळ दाखल करावा. व्ह्यू पॉइंटवर चौकीदार नियुक्त करावा. त्या अजिंठा लेणी परिसरात पुरातत्त्व विभागाच्या सर्व नियमांचे पालन करत पाझर तलावाच्या उंची वाढविण्याबाबत व इतर कामांबाबत विचार करावा. पुरातत्व विभागानेही लेणी परिसरातील सुशोभीकरण, दुरुस्ती यावर भर द्यावा. याशिवाय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित न येणाऱ्या वास्तूंबाबत लेखी प्रस्ताव दाखल करावा. जेणेकरून त्या वास्तूंचा विकास प्रशासन करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजिंठ्यातील चार दरवाजांची दुरूस्ती, वन विभागाच्या विश्रामगृहाची दुरूस्ती, लेणापुरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केले. तसेच वन, पर्यटन विकास महामंडळ, पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा परिषदेस विविध उपाययोजना सुचविल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी राज्यमंत्री श्री. सत्तार यांना सविस्तर माहिती दिली.