प्रगतीपथावर असणारे जलसंधारणाचे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

औरंगाबाद,

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे  लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.

जलसंपदा विभागामार्फत आयोजित गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, अंबादास दानवे, सतीष चव्हाण, रमेश बोरनारे, विक्रम काळे, उदयसिंह राजपुत, संजय सिरसाट, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री म्हणाले की, जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची दुरूस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्याने या क्षेत्राचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले असून प्रस्ताव प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी सदरचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे जेणेकरुन सर्व प्रकल्पांचे पाणी शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला मिळेल. जायकवाडी सह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी देखील सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!