पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग

‘आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य’ या विषयावर डॉ.अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या अहवालाचे केले प्रकाशन

नवी दिल्ली, 21 जुलै 2021

“पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली असल्याचे” प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी केले. ‘स्वयंपूर्णतेतून येणारा आत्मविश्वास पुढच्या पिढीपर्यंत झिरपून देशातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे वळण्यास मदत होईल ‘ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य’ या विषयावर, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वातील आढावा समितीच्या अहवालाच्या प्रकाशन समारंभानंतर ते बोलत होते.

विज्ञान तंत्रज्ञानाचा विचार करता, भारताला जागतिक पातळीवर मानाचे स्थान यापूर्वी मिळालेले आहेच, परंतु त्याचवेळी, ‘विज्ञानक्षेत्रात नागरिक-केंद्रित पद्धतीने परिश्रम घेतले पाहिजेत’ या पंतप्रधानांच्या आदेशाला अनुसरून वाटचाल करण्यासाठी, आजवर वापरल्या न गेलेल्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे- असेही डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले. “फारच कमी देशांना वैविध्यपूर्ण साधनसंपत्तीची देणगी मिळालेली असते. तशी ती भारताला मिळालेली असल्याने विविधीकरण / फेरबदल या संकल्पनेकडे एक फायदेशीर उपयुक्त मार्ग म्हणून बघावे”- असेही त्यांनी सुचविले.

“विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचा भारताला पूर्वापार चांगला अनुभव आहे. अशा प्रकारच्या सहकार्याच्या बाबतीत सहकार्यात्मक आणि स्पर्धात्मक अशा दोन्ही भावना हातात हात घालून एकत्रितपणे पुढे जातात, आणि याचे अनेक फायदे होतात.” असे मत डॉ.अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!