गोहत्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल वासिंद पोलीसांची धडक कारवाई वनपालाच्या सतर्कतेमुळे गोहत्या..
ठाणे : शहापुर तालुक्यातील वासिंद जवळील शेरा-बावघर जंगलात गोहत्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना वासिंद पोलीसांनी ताब्यात घेतले.
शहापुर वनविभाग हद्दीतील शेरा बावघर जंगलात चितळाची शिकार होणार आहे अशी गुप्त माहिती वन अधिकारी यांना मिळाली. त्यामुळे सदर जंगल विभागात वन अधिकारी व वनपाल यांची गस्त चालू होती. या गस्ती दरम्यान छोटा हत्ती टेम्पो व अॅक्टिवा स्कुटी गाड्या सोबत काही इसम संशयित रित्या हालचाल करताना आढळले. संबंधित इसमांची चौकशी केली असता त्यांनी निसार मोहम्मद शेख (वय ४० वर्षे) रा. शेई, तकदीर मोहम्मद शेख (वय २५ वर्षे), सलीम मोहम्मद शेख (वय २८ वर्षे), साबीर रेहमान शेख (वय ४४ वर्षे) अशी सांगितले आणि तेथुन पळुन गेले. शहापुर वन विभाग अधिकारी व वनपाल यांनी या विभागात अजुन आजुबाजूला पाहणी केली असता तिथे एक गाय व वासरु पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर गाय व वासराचे पाय सोडताच ते जंगलात पळून गेले.
सदर घटना घडल्या नंतर वनविभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती परंतु सोशल मिडियावर या घटनेची बातमी व फोटो पसरल्याने त्या घटनेवर संताप व राग व्यक्त होत होता. या घटनेची दखल वासिंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी घेवुन शहापुर वनविभागाचे वनपाल वाल्मिकी बोरसे यांना वासिंद पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांनी सदर गाय व वासरु कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले होते अशी माहिती दिली. सदरील चारही इसमां विरुद्ध भा.द.वि. सं.३७९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम सन १९७६ सुधारित २०१५ चे कलम ११(फ) अन्वये फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला असुन वरील चारही इसमांना मोठ्या शिताफीने शोध घेवून त्याच दिवशी अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.