गोवा विधानसभेत सुदिन ढवळीकर यांचे आंदोलन; सरकार चर्चा टाळत असल्याचा केला आरोप
पणजी (गोवा) ,
राज्यातील एकमेव धारबंदोडा तालुक्यातील संजीवनी साखर कारखान्याच्या विषयावर सरकारने चर्चा करणे टाळले. यामुळे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सरकारचा निषेध करत सभागृहात जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले.
संजीवनी साखर कारखान्याच्या विषयवार चर्चा करण्यासाठी विषय विधानसभेच्या पटलावर आला असताना त्यावर विधानसभा अध्यक्षांनी बोलणे टाळले. यावेळी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आक्रमकपणा दाखवत आमदार प्रसाद गावकर यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ढवळीकर यांना प्रतिसाद न देता विधानसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब केले.
आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडतो, त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी भाजप चर्चा न करता कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभा सभागृहातूनच सुदिन ढवळीकर यांनी केला.
दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाची आज सांगता होत आहे. त्याबरोबरच सरकारच्या या टर्मचे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे, विरोधकांनी राज्यातील अपुरी रस्ते सुविधा, वीज सुविधा यावरून सरकारला धारेवर धरत विधानसभेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष आमदार रोहन खवटे, मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत आजच्या अर्ध्या सत्रातले कामकाज निभावून नेले.