एनसीबीचे अधिकारीही भाजप नेत्यांची भाषा बोलतायेत – नवाब मलिक
मुंबई,
गोव्याला जाणार्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. याबाबत एनसीबी अधिकार्यांकडून पत्रकार परिषद घेत, कारवाई ही कायदेशीर असून, याबाबत कोणाला संशय असल्यास न्यायालयात जावे, असे म्हणत नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, प्रत्येक प्रकरणाचे उत्तर न्यायालयात जाऊन घ्यावे, अशी भाषा आतापर्यंत भाजपचे नेते बोलत होते. पण आता एनसीबीचे अधिकारीदेखील आरोपांबाबत खुलासा न देता न्यायालयात जावे, असा सल्ला देत आहेत. हे अधिकारीदेखील भाजपच्या नेत्यांची भाषा बोलायला लागलेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईवरून गोव्याला जाणार्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी छापा टाकला होता. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला शनिवारी रात्री एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. एनसीबीने केलेली ही कारवाई खोटी असून, क्रूझवर एनसीबीला ड्रग्स सापडलेच नाहीत. तसेच अरबाज आणि आर्यनला त्या रात्री एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे दोन व्यक्ती हे एनसीबीचे अधिकारी नसून, त्यातील एक भाजपच्या उपाध्यक्ष पदावर असलेला मनीष भानुषाली तर दुसरी व्यक्ती के. पी. गोसावी नावाची होती, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला.