ख्रिस गेलसोबत पंजाब संघाने केला दुर्व्यवहार, ’या’ माजी कर्णधाराचा आरोप

नवी दिल्ली,

पंजाब संघाचा स्टार खेळाडू आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलच्या 14 व्या सीझनपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. त्यावरुन आता आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने आता पंजाब संघावर ख्रिस गेलसोबत दुर्व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

आयपीएलच्या सर्वाधिक यशस्वी फलंदाजाला पंजाबच्या संघाने चांगली वागणूक दिली नाही असा आरोप केविन पीटरसनने केला आहे. पंजाब संघाने दिलेल्या चुकीच्या वागणुकीला कंटाळून ख्रिस गेलने आयपीएलमधून बाजूला होत असल्याचं जाहीर केल्याचं पीटरसनने सांगितलं आहे.

ख्रिस गेलने आपल्याला बायो बबलचा त्रास सुरु असल्याने आपण आयपीएलच्या 14 व्या सीझनपासून बाजूला होत असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं होतं.

केविन पीटरसनने म्हटलं आहे की, ‘ख्रिस गेलसोबत पंजाब संघाने चांगला व्यवहार केला नाही. पंजाब संघाने केवळ आपला वापर करुन घेतल्याची भावना ख्रिस गेलची झाली होती आणि याला तो कंटाळला होता. त्याच्या जन्मदिनाच्या दिवशीही त्याला खेळायची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या ख्रिस गेलने बाजूला होत असल्याचं जाहीर केलं.‘

ख्रिस गेल आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याने पंजाबकडून 10 सामने खेळले आणि केवळ 193 धावा पटकवण्यात तो यशस्वी झाला.

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनीही ख्रिस गेल आयपीएलपासून बाजूला होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंजाब संघाला ख्रिस गेलची कमतरता भासेल असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!