संजय राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना चिमटा
मुंबई
संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचं दुसरं कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असंही ते म्हणाले.
संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीवरुन बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. 56 वाले मुख्यमंत्री होऊ शकतात तर 54 वाले उपमुख्यमंत्री आणि 44 वाले महसूलमंत्री होऊ शकतात. तर 106 आणि 13 अपक्ष असे 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत. संजय उपाध्याय राज्यसभेवर जाणारच असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यपाल-मुख्यमंत्री लेटर वॉरवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील जनता हा रोजचा खेळ पाहत आहे. राज्यपाल हे प्रमुख आहेत, त्यांच्या सहीने विधानसभा बोलवता येते. पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणार्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचं याबाबतचं पत्र आज सामना वृत्तपत्रात छापून आलं आहे. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब-ुनुकसानीचा दावा करणार आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे