मुंबईत महिलांच्या लसीकरणावर भर देणार; आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव
मुंबई,
राज्यात आणि मुंबईत वेगाने कोरोना लसीकरण सुरु आहे. राज्यात 55 टक्के नागरिकांचा पहिला तर 25 नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत. मात्र मुंबईचा विचार केला तर मुंबईत महिलांच्या लसिकरणावर भर यापुढे देण्यात येणार आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकणाला कमी प्रतिसाद मिळत आहे ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महिलांचं लसीकरणाचं प्रमाण वाढवं यासाठी मुंबई महापालिका महिला विशेष लसीकरण सत्र सुरु करणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस महिलांसाठी राखीव असणार आहे. पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिलांच्या लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह असणार आहे. श्रावण, हरतालिका, गणेशोत्सव या सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे.
महिलांची लसीकरणातील टक्केवारी वाढावी याकरिता मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये 42.32 टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 47 लाख 13 हजार 523 महिलांनी तर 63 लाख 07 हजार 471 पुरुषांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत 1182 गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.
अनेक कुटुंबांमध्ये पुरुषांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाते. लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा येईल त्यामुळेही महिलांचं लसीकरण लांबणीवर टाकलं जात आहे. महिलांच्या सुविधेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये घराजवळच लसीकरण केंद्र उपलब्ध होईल, असा प्रयत्नही मुंबई महापालिका प्रशासनानं केला आहे.
मुंबई लस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण
मुंबईत 23 हजार 239 नागरिकांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही 9000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या 14 हजार 239 आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे.
18 ते 44 वयोगटात
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4420
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 1835
45 ते 59 वयोगट
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4815
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 2687
60 वर्षांवरील नागरिक
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण – 5004
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण – 4489