झुंज अपयशी! एकतर्फी प्रेमातून झालेल्या थरारक हल्ल्यातील जखमी युवतीनं घेतला अखेरचा श्वास
चंद्रपूर,
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, अमरावती आणि ठाण्यानंतर चंद्रपूरातील एक अल्पवयीन मुलगी नराधमाच्या क्रूरतेची शिकार ठरली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेण्यार्या या तरुणीची पाचव्या दिवशी जगण्याची झुंज अपयशी ठरली आहे. सोमवारी तिने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
वनश्री अशोक आंबटकर असं हत्या झालेल्या 17 वर्षीय तरुणीचं नाव असून ती चंद्रपुरातील नेताजी बाबूपेठ परिसरातील रहिवासी होती. वनश्री एका खाजगी रुग्णालयात परिचारिकेचं काम करते. तर प्रफुल्ल प्रकाश आत्राम असं अटक केलेल्या 32 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी आत्राम मागील काही दिवसांपासून एकतर्फी प्रेमातून मृत तरुणीचा पाठलाग करत होता. दरम्यान मात्र 9 सप्टेंबर रोजी वनश्री आपलं रुग्णालयातील काम उरकून घरी जात होती.
दरम्यान, महाकाली मंदिर परिसरातील त्रिवेणी बारसमोरून जात असताना आरोपी प्रफुल्लनं वनश्रीला एकटीला गाठलं. याठिकाणी त्यानं तिच्यावर आपलं किती प्रेम आहे, सांगून प्रेमाची मागणी घातली. आरोपीवर प्रेमच नसल्यानं वनश्रीनं त्याला थेट नकार दिला. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं काही कळायच्या वनश्रीच्या पोटात धारदार चाकू खूपसला. हा हल्ला इतका भयंकर होता. की वनश्री जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
या थरारक घटनेनंतर स्थानिक लोकांनी त्वरित तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण घाव गंभीर असल्यानं वनश्रीला पुढील उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलं. याठिकाणी उपचार घेत असताना, पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.