आम्ही नारायण राणेंचे नाही; तर राज ठाकरेंचे कार्यकर्ते, दहीहंडीवरून मनसेचा सरकारला इशारा

ठाणे,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध घातले असताना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी साजरी करण्यावर ठाम आहे. याच अनुषंगाने ठाण्यातील भगवती मैदानात उभारण्यात आलेल्या स्टेजवर सोमवारी स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे उपोषणाला बसलेले मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आला. दरम्यान आमच्यावर कोणतेही आणि कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दहीहंडीचा सण साजरा करणारच यावर मनसे ठाम असल्याचे यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उत्सव अणि सोहळ्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे हिंदूंचा सण म्हणून दहीहंडी सण साजरा करणार असल्याची भूमिका मनसेच्या वतीने घेण्यात आलेली आहे. त्यासाठी मनसेने तयारीला सुरुवात केली होती. परवानगी नसताना देखील मैदानावर स्टेज उभारण्यात आला होता. तो काढण्यासाठी मोठ्या प्रमानात ठाणे पोलीस आले होते. त्यामुळे मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांसह मंचावरच साखळी उपोषणास बसले होते. मात्र या ठिकाणी बसलेल्या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर देखील काही मनसैनिक मैदानातून हटले नाहीत. सर्व कार्यकर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले होते. यामुळे या ठिकाणी मनसे विरुद्ध पोलीस असा संघर्ष पाहायला मिळाला.

ठाकरे सरकारने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी नांदगावकर यांनी देखील दहीहंडी साजरी करणार असा निर्धार केला होता. मात्र नौपाडा पोलिसांनी सर्व सामान जप्त केले असून कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अखेर सोडून दिले. दरम्यान मनसे दहीहंडीचा उत्सव करणारच असा पवित्रा अविनाश जाधव यांनी घेतला आहे.

आम्ही राणेंचे नाही राज ठाकरेंचे कार्यकर्ते –

हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करून समोर यावे, असे थेट आव्हान यावेळी अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला दिले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी अविनाश जाधव, मनसे शहरप्रमुख रवींद्र मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आम्ही नारायण राणेंचे नाही, तर राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत, अशा शब्दात जाधव यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!