विनयभंगाचे आरोप झाल्यानंतर व्हिडीओ माध्यमातून आत्महत्येची धमकी, गेवराईतील मठाधिपतीला अखेर बेड्या
बीड
बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगाव मधल्या सूर्य मंदिर संस्थानाच्या मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून या महाराजांनी आत्महत्या करत असल्याची धमकी दिली होती. हनुमान महाराज यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. याच संदर्भात आपल्याला गावकरी नाहक अडकवत आहेत म्हणून आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओतून सांगून ते गायब झाले होते. त्यानंतर बरेच दिवस अनेक यंत्रणा महाराजांच्या शोधात लागल्या होत्या.
व्हिडिओ करून आत्महत्येची धमकी दिल्यानंतर महाराज गायब झाले. त्यानंतर ते बरेच दिवस कुणालाही आढळून आले नाहीत. मात्र काही दिवसांनी महाराजांच्या वकिलाने बीडच्या सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे महाराजांना अटक होणार अशी चर्चा होती. अखेर गेवराई पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने सूर्य मंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराजांना गेवराईमध्ये सकाळीच अटक केली आहे.
हनुमान महाराजांनी पाच मिनिटात आत्महत्या करणार आहे असा व्हिडीओ जारी केला होता. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. याच व्हिडिओमध्ये माझ्या मृत्यूला गावातील काही राजकीय व्यक्ती, पत्रकार, पीडित कुटुंब जबाबदार आहे, असे सांगून आपण गळफास घेणार असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर गेवराई पोलीस तीन दिवस वेगवेगळ्या भागांमध्ये महाराजांना शोधत होते मात्र महाराज काही हाती लागले नाहीत.
महाराजांनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सगळ्यांना खात्री झाली की महाराज आता जिवंत आहेत. मात्र त्यानंतर काही काळ पोलिसांनी महाराजांची शोध मोहीम थांबली होती. बीडमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हनुमान महाराजांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र खंडपीठानेही तो अर्ज फेटाळला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस पुन्हा कामाला लागले आणि अखेर महाराजला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.