लसींचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे पास देण्यास आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी ,
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑॅगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यानंतर आज लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचा रेल्वेचा मासिक पास देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पास काढण्यासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावर पहिल्याच दिवशी लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या 12 हजार 771 प्रवाशांनी पास काढल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. सगळ्यात जास्त पास डोंबिवली 781 त्यानंतर कल्याण 662 जणांनी तिकीट खिडक्यांवर नोंदणी करून पास काढले आहेत.
तर पश्चिम रेल्वे मार्गावर 4 हजार 987 इतक्या मासिक पासची विक्री झाली आहे. यात 975 प्रथम दर्जाचे तर 4012 सामान्य डब्याचे पास काढण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सगळ्यात जास्त बोरिवली स्थानकावर पास विक्री झाली आहे, ही संख्या 449 इतकी आहे.
नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक
पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना दिनांक 15 ऑॅगस्टपासून प्रवासाची मुभा
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष
संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 स्थानकांवर मदत कक्ष
सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत
घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये
बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही
मदत कक्षावरील महापालिकेचे कर्मचारी संबंधित नागरिकाच्या कोविड प्रमाणपत्राची सत्यता कोविन अॅपवर पडताळतील. तसेच छायाचित्र पुरावा देखील तपासतील. दोन्ही कागदपत्रं पडताळल्यानंतर त्यावर शिक्का मारण्यात येईल. हे शिक्का मारलेली कागदपत्रं रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीवर सादर केल्यावर मासिक पास मिळणार आहे. मात्र हा पास 15 ऑॅगस्टनंतरच लागू होईल.